Latest Marathi News
Ganesh J GIF

विजय शिवतारे यांनी अजित पवारांची माफी का मागावी…बघा नेमकी बातमी काय…?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. शिवतारे यांनी अजित पवारांची जाहीर माफी मागावी. जोपर्यंत शिवतारे माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, फजल शेख यावेळी उपस्थित होते.

गव्हाणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये आहे. महायुती म्हणून लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे जायचे आहे. महाराष्ट्रातून महायुतीच्या ४५ जागा निवडून आणण्यासाठी काम करत आहोत. परंतु, बारामतीमध्ये पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या विधानामुळे आम्ही नाराज आहोत. कार्यकर्ते संतप्त आहेत. आमच्या नेत्यांबाबत अतिशय चुकीची विधाने त्यांच्याकडून केली जात आहेत. त्यांच्या विधानामुळे महायुतीला तडा जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मावळच्या जागेवर दावा आहे. परंतु, महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटली आणि शिवतारे यांची अशीच भूमिका राहिली.

तर, मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार आहोत. शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी. जोपर्यंत माफी मागत नाहीत. तोपर्यंत आम्ही मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत. राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही अशीच भूमिका घेतील. शिवतारे यांनी माफी मागितल्यास मावळमध्ये युतीचा धर्म पाळला जाईल. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहे. त्यांनी बारामतीत मोठी विकास कामे केली आहेत. त्यामुळे बारामतीत आमचा उमेदवार निवडून येईल, याची आम्हाला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

शिवतारे हे वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत विधाने करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचे काम करणार नाहीत, असे नाना काटे म्हणाले. भोईर म्हणाले, शिवतारे हे बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. हे चुकीचे आहे. अजित पवार हे निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांच्याबाबत बोलले होते. शिवसेनेपेक्षा आमची जास्त ताकद आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!