
शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे खासदार अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजी आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.दोन्ही बाजूंनी आता भेटीगाठी वाढवल्या आहेत. आज दोन्ही नेते शिवनेरी किल्ल्यावर आले होते, यावेळी खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील समोरासमोर भेटले. यावेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा या दोन उमेदवारांची लढत होणार आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला गेली, त्यामुळे आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. दोन्ही बाजूनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवनेरी किल्ल्यावरुन प्रचाराला सुरूवात केली.
शिवनेरी किल्ल्यावर यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार आढळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे समोरसमोर भेटले. यावेळी कोल्हे यांनी आढळराव यांना वाकून नमस्कार केला. यावेळी माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ते वयाने मोठे आहेत. ही आपली संस्कृती आहे. समोर वयस्कर व्यक्ती आली की मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे. सध्या द्वेषाचे राजकारण सुरू झालेलं आहे. या पलिकडे जाऊन सर्वांनी राजकारणातील ही सुसंस्कृतता जपली पाहिजे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
“आज शिवनेरीवर नतमस्तक होऊन महाराजांकडे सर्वसामान्य माणसासाठी जे रयतेचे राज्य जे तुम्ही अस्तित्वात आणले होते त्या सर्वसामान्य रयतेसाठी लढण्यासाठी बळ द्या, हे मी आज शिवनेरीवर मागितले, असंही अमोल कोल्हे म्हणाले.या भेटीवर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठांना पायाला स्पर्श करण्याची प्रथा आहे. त्यांनी शुभेच्छा दिल्या मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असंही आढळराव पाटील म्हणाले.
आज शिवाजी आढळराव पाटील यांनी शिवनेरीवर जात प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, अनेक वर्षांपासून मी तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे दोन्ही प्रकारे शिवजयंती करतो. शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे. यापुढे प्रचारादरम्यान आणि निवडून आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुधाच्या भावाचे प्रश्न सोडविण्यावर माझा भर असणार आहे. मी नौटंकी करत नाही. मी शेतकरी आहे, शेतीतील माणूस असल्यामुळे मला त्यांच्या प्रश्नांची आणि अडचणींची जाणिव आहे.”शिवनेरीच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे. दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. काही प्रश्न मी सोडवले आहेत. मी विनाकारण नौटंकी करत नाही. पुढील काळात जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असंही पाटील म्हणाले.