
‘आम्ही मर्द आहोत. मर्दाच्या नादाला कोणी लागायचं नाही’
या आमदाराने विधिमंडळातील राड्यानंतर दिला थेट इशारा
मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- शिंदे गट आणि विरोधकांमधील संघर्ष हाणामारीपर्यंत गेल्याचे बुधवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर दिसून आले. ‘५० खोके, एकदम ओके’ ही विरोधकांची घोषणा जिव्हारी लागल्याने अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य करीत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.या संघर्षावर बोलताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आपण बांगड्या घातलेल्या नाहीत असा इशारा विरोधकांना दिला आहे.
भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, “त्यांनी तीन दिवस घोषणाबाजी केली, आम्ही दोनच दिवस घोषणा केली, जी त्यांच्या वर्मी लागली आहे. कोण काही विचारतंय का याची आम्ही वाट पाहत होतो, पण कोणी काही विचारलं नाही. प्रत्येकाने आपली मर्यादा राखली पाहिजे. आम्हाला डिवचू नका, आम्ही काही करणार नाही. पण तुम्ही अंगावर आलात, तर आम्ही हात बांधून बसणार का. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बाळासाहेबांनी सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं. त्याप्रमाणे आम्ही लढत आहोत तुम्ही शिस्त पाळल्यास, आम्हीदेखील पाळू, आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? आम्ही मर्द आहोत. मर्दाच्या नादाला कोणी लागायचं नाही,” असा इशारा भरत गोगावले यांनी दिला.
अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत घोषणा दिल्या. ‘युवराजांची दिशा चुकली’ असे म्हणत आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करुन बसलेलं दाखवण्यात आलेलं आहे.