आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या तयारीला वेग येताना दिसत आहे. सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीला हीच लय विधानसभा निवडणुकीत कायम राहील, असा विश्वास वाटत आहे.तर महायुती जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी नवीन रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. यातच आता तुम्ही कसे निवडून येत नाही, हेच बघतो, असा शब्द शरद पवार यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. कार्यकर्त्यांची संवाद साधत आहेत. पदाधिकारी, नेते यांच्याशीही आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. याच एका बैठकीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना इथली निवडणूक आपणच जिंकू, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.तुम्हाला एवढेच सांगतो की, तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसे निवडून येत नाही, हेच मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू. महिन्या-पंधरा दिवसांत सगळे एकत्र बसून चर्चा करून मला येऊन सांगा. बारामतीत सांगा, नाहीतर पुणे-मुंबईत येऊन सांगा की, आता आम्ही एक झालो आहोत. आमच्यापैकी कुणालाही तुम्ही संधी द्या, आम्ही त्याच्यासाठी काम करतो. एवढे तुम्ही मला सांगा, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले अन् विजयाचा शब्द दिला.
एका मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. कुणाचा काळ संपला हे त्यांना आता कळलेच असेल. इतकेच नाही, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांना सत्ता तर मिळाली पण त्यांना मुख्यमंत्र्याचे नुसते मंत्री व्हावे लागले. त्यामुळे काळ कुणाचा संपला हे सांगायला नको. लोक बोलून जातात, आपण दुर्लक्ष करायचे असते. देवेंद्र यांचे वडील गंगाधर फडणवीस हे विधानपरिषदेत होते. चांगला माणूस होता. देवेंद्र फडणवीसांचा सुरुवातीचा काळही मला चांगला वाटला होता. त्यांच्यात प्रतिभा जाणवत होती. पण आता मात्र मला त्यांची धावपळ पूर्णपणे वेगळी वाटते, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.