
नवीन वर्षाच्या स्वागताला पहाटेपर्यंत मिळणार दारु
राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, हे असणार नियम, पण हिरमोडही होणार?
पुणे – नवीन वर्ष सुरु होण्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सगळीकडे जोरदार तयारी करण्यात येत आहे. पण यामध्ये मद्यपान करुन स्वागत करणा-यांची संख्या देखील मोठी असते. पण सरकारने यावेळी कडक नियमावली केल्यामुळे तळीरामांचा हिरमोड होणार आहे.
नवीन वर्षाला काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे शासनाने नियमावली जाहिर केली आहे. नवीन वर्षनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसेच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ वाढवल्याने पोलिसांची मात्र मोठी कसरत होणार आहे. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे. तसेच नव्या नियमांनुसार, नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे हॉटेल किंवा बारमध्ये जाणार आहेत, अशा मद्यपींना केवळ चार पॅक एवढीच दारू मिळणार आहे. चार पॅकपेक्षा अधिक दारू कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही. याबाबत हॉटेल असोसिएशनकडून माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर दारु घेण्यासाठी वयाच्या अटीचेही तंतोतंत पालन केले जाणार आहे.
आतापर्यंत क्लबमधील मद्याच्या पेगवर व्हॅट आकारला जात नव्हता. बाहेरच्या हॉटेलमधील दारू महाग, तर क्लबमधील दारू स्वस्त असा प्रकार होता. त्यामुळे थर्टी फस्टला अनेकजण हाँटेलमध्ये किंवा बारमध्ये जाण्याचे नियोजन करतात. मात्र आता क्लबमधील दारुही महागल्यामुळे मद्यपींच्या खिशाला झळ बसणार आहे.