
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या आपल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होत आहे. यातच आता अकलूजमध्ये झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी केलेलं भाषण चर्चेत आलं आहे.‘माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही’, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमधील सभेत रविवारी केलं. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणविसांनी रविवारी अकलूजमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेमध्ये बोलताना मोहिते पाटील कुटुंबियांना लक्ष्य केलं. आता खऱ्या अर्थाने परतफेड करण्याची वेळ आली होती. पण यावेळी त्यांनी पुन्हा पवारांचा हात पकडला. मला आता त्याची चिंता नाही. मला विश्वास आहे, की जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी आहेत. त्यामुळे कोणी कितीही विश्वासघात केला तरी जनता विकासकामाला जागून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना निवडून देणार’, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी एक्स देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल आणि आज ज्याला तुम्ही ईश्वराचा आशीर्वाद म्हणताय ना ते आशीर्वाद नाही तर सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत. तुम्ही कुणाला येडं बनवता? ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.”तुम्हाला सांगतो मी कुणाच्या वाट्याला जात नाही, कुणाला त्रासही देत नाही. पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही. माझा इतिहास तपासा. मी काहीच करत नाही, मी राजकारणीच नाही. त्यामुळे मला ते छक्के-पंजे हे काही जमत नाही. याला गाड, त्याला पाड हे कधीच केलं नाही. आई तुळजाभवानीचा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याशी विश्वासघात केला की सत्यानाश होतोच,” असं फडणवीस म्हणाले आहेत.