लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्यात सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजाराऐवजी दोन हजार रुपये मिळतील असे सांगीतले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई देण्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुक्ताईनगर येथे सोमवारी सायंकाळी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, आचारसंहिता लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बँक खात्यात जमा केले आहेत.
आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही तर कॉमन मॅन असल्याचे सांगताच मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली.