Latest Marathi News
Ganesh J GIF

अजितदादांचे आमदार कधी बंड करणार ? -रोहित पवार

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत. राज्यसभेवर न पाठवल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे.या सर्व चर्चा असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं मोठं विधान आलं आहे. एकटे छगन भुजबळ नाही तर अजितदादा गटाचे इतर आमदारही अजितदादांना सोडणार आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर हे आमदार कधी बंड करतील, याची माहितीही रोहित पवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ पक्ष सोडतील अशा चर्चा सुरू आहेत. त्यावर आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केलं आहे. मी अजित पवारांसोबत नाही, तर राष्ट्रवादी सोबत आहे, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं. छगन भुजबळ हे अनुभवी नेते असून त्यांना काही अंदाज आला असेल. त्यामुळेच त्यांनी तसं विधान केलं असावं. फक्त छगन भुजबळ नाही तर अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडणार आहेत. अधिवेशनामध्ये निधी घेतील आणि नंतर अजितदादा गटाला रामराम करतील, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाला फायदा होतो आणि महायुतीमध्ये चलबिचल होते, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले होते. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महायुतीतील सर्व नेते आपापलाच विचार करत आहेत. जनतेचं यांना काही पडलेलं नाही. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील आमदारांना भीती वाटायला लागली आहे. आता आपलं काय होणार? असं त्यांना वाटतंय. म्हणून पराभवाचं खापर कुणाच्या माथी फोडायचं, तर कधी भुजबळ साहेबांचे नाव घ्यायचे तर कधी अजित पवारांचं नाव घ्यायचं सुरू आहे, असा रोहित पवार यांनी केला.

आजपासून राज्यात पोलीस भरती सुरू झाली आहे. त्यावरही आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस भरतीला आलेल्या उमेदवारांना सुखसुविधा दिल्या पाहिजेत, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तसेच या सरकारवर भरोसा नसल्यामुळे भरती जर पुढे ढकलली तर परत आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे त्यात मुले अडकू शकतात, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहेयपोलीस दलात कॉन्स्टेबलची भरती आहे. या 17 हजार पदांसाठी 17 लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. हा बेरोजगारीचा मोठा रेशिओ आहे. ही देशाची वस्तुस्थिती आहे. मात्र हे सरकार कोणाला मंत्रिपद द्यायचं? विस्तार कसा करायचा? खातेवाटप कशी करायची? निवडणूक येणार आहे, तर कुणाला कुठलं तिकीट द्यायचं, यातच हे गुंतले आहे. त्यामुळे गरिबांकडे, या मुलांकडे सरकारचं कुठलंही लक्ष नाही. 17 लाख विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीकडे लक्ष दिले पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!