Latest Marathi News
Ganesh J GIF

मोदींनी हा जावईशोध कुठून लावला ? शरद पवारांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहे. प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी वारंवार एक आरोप करत आहेत, तो म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार आलं तर 5 वर्षांत 5 पंतप्रधान आणणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला? असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, इंडिया आघाडीमध्ये अद्याप पंतप्रधानपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर यासंदर्भात निर्णय घेऊ. शरद पवार कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

मोदींच्या आरोपावर बोलताना शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीचं सरकार आल्यास 5 वर्षात 5 पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधानांनी कुठून लावला? आमच्या आघाडीत पंतप्रधानाबाबत काही चर्चा झाली नाही. 1977 साली जेपी नारायण यांच्याकडे लोक आकर्षित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला, तुमचा नेता कोण असं तेव्हा विचारले जायचे. तेव्हा मोरारजी देसाई यांचं नाव निवडणुकीनंतर पुढे आलं. त्यामुळे पंतप्रधानपदाबाबत आज आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर नेत्याची निवड केली जाईल आणि पूर्ण सहकार्य करून स्थिर सरकार देत अखंड 5 वर्ष चालवलं जाईल. त्यामुळे 5 वर्ष 5 पंतप्रधान ही कल्पना मोदींच्या डोक्यातून आली. आमच्या डोक्यात नाही, असे जोरदार टोला शरद पवार यांनी लगावला.

मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बोलल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही. त्यांची स्टाईल आहे, कोल्हापूरात आल्यावर नमस्कार कोल्हापूरकर असं बोलून भाषणाला सुरुवात करायची. पहिले 3 ते 4 वाक्य त्यांचे स्थानिक नेते लिहून देतात आणि मोदी बोलतात. मात्र कराडच्या सभेत यशवंतराव चव्हाणांचे त्यांनी नाव घेतले नाही, भाषणात कराडचा साधा उल्लेखही केला नाही. सातारच्या सभेत त्यांनी सातरचा उल्लेख केला, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!