राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस बाकी असताना देखील अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवरुन उमेदवारी मिळण्यासाठी सध्या पार्थ पवार बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे इच्छूक आहेत.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाचं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून थेट त्यांना राज्यमंत्रीपद द्या अशी मागणी जोरदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे केवळ उद्याचा दिवस उमेदवार ठरवण्यासाठी बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आता कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी भरण्यासाठी गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दिवसभरात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रह धरला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊन त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे आता अजितदादा सुनेत्रा पवार यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यसभेच्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील 11 ते 12 जण इच्छूक होते. यामध्ये पार्थ पवार यांचाही समावेश आहे. पार्थ पवार यांनी देखील कुटुंबातील सदस्य खासदार व्हावा, यासाठी मंगळवारी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची भेट घेतली होती. पार्थ पवार हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छूक असल्याची चर्चा होती. मात्र, तेव्हा संधी न मिळाल्याने ते राज्यसभेवर जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये उमेदवारीचा हा सस्पेन्स संपू शकतो. अजित पवार गटाच्या खासदारांची संख्या वाढल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रीपदावरील त्यांचा दावा भक्कम होईल. त्यादृष्टीने राज्यसभेची ही निवडणूक महत्त्वाची आहे.