Latest Marathi News
Ganesh J GIF

साताऱ्याच्या जागेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? सिल्व्हर ओक’वर खलबतं

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या जागेवर कोण निवडणूक लढवेल? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. महाविकास आघाडीत साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाला सुटली आहे.कारण या मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे आहेत. असं असलं तरी श्रीनिवास पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे साताऱ्याच्या जागेवर कोण उमेदवार असेल? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसेल यांना साताऱ्याचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्याविरोधात या मतदारसंघात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण त्यांचं नावही आता मागे पडताना दिसत आहे. कारण शरद पवार गटाने पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. ही अट पृथ्वीराज चव्हाण यांना मान्य नसल्याची माहिती समोर येत आहे. असं असताना आता आणखी एक नवं नाव साताऱ्यासाठी समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे नेते शिशिकांत शिंदे यांनी आज शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील हे देखील होते. शरद पवार यांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी साताऱ्यासाठी ते स्वत: इच्छुक असल्याचं स्पष्ट झालं. तसेच सारंग पाटील यांच्यासाठीदेखील श्रीनिवास पाटील यांचा आग्रह असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे आता सारंग पाटील यांचं नाव निश्चित होतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा नेतृत्व करावं, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण त्यांनी म्हटलेलं आहे की, त्यांचं वय फार जास्त झालंय. त्यांना चालताही व्यवस्थित येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाला त्या ठिकाणाहून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा आग्रह आहे.साताऱ्यात 2019 मध्ये पोटनिवडणूक पार पडली तेव्हा श्रीनिवास पाटील हे गव्हर्नर म्हणून निवृत्त झाले होते आणि त्यावेळी देखील त्यांनी मोठ्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. मी शरद पवार यांचा एकनिष्ठ सैनिक आहे. त्यामुळे संघर्ष हा माझा पिंड आहे. मी परिणामाचा विचार करत नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, विधानसभा निवडणुकीत जे अपयश मिळालं ते लोकसभेच्या निवडणुकीत धुऊन काढायचं, मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच त्या ठिकाणाहून निवडणूक लढवेन”, अशी आशा शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

“सातारा हा शरद पवारांच्या विचारांचा जिल्हा आहे. त्या ठिकाणी त्यांचं मताधिक्य जास्त आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे आम्ही ऐतिहासिक विजय मिळवू, असा मला विश्वास आहे. महाराष्ट्र शेतकरी माथाडी कामगार, कष्टकरी हे सगळे नाराज आहेत. महाराष्ट्रामध्ये एक वेगळा निकाल या लोकसभेमध्ये पाहायला मिळेल”, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.“काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. पण ते चिन्ह बदलून लढण्यास तयार नाहीत. पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्यासाठी आम्ही काम करू. सगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही आहे पण सगळ्यात जास्त घराणेशाही ही भाजपमध्येच आहे. आणि त्यांच्या मित्र पक्षांमध्येच आहे. त्यांची जर यादी काढली तर लक्षात येईल, लोकसभेला जो निर्णय होईल तोच इतर निवडणुकीत होणार”, असं शशिकांत शिंदे म्हणाले.“महायुतीमध्ये जे लोक गेले आज त्यांनाच तिकीट मिळत नाहीय. भाजपची नीती ही इतर पक्षांना वापरायचं आणि आपला पक्ष मजबूत करायचा आणि मग त्यांना उचलून फेकून द्यायचं. विद्यमान खासदारांच्या तिकीट का बदललं? यांचं उत्तर महायुतीने द्यावं. आमदार, खासदार संभाळण्यासाठी जनतेचा पैसा खर्च केला जातोय. ईडीचा पैसा लोकांना देणार म्हणतात, 15 लाखांप्रमाणे मोदींची ही सुद्धा आणखी एक घोषणा”, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!