मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन का?
आपचा सवाल, मणिपूरच्या भीषण 'नग्न ' सत्याच्या विरोधात आप चा आक्रोश मार्च
पुणे दि २६(प्रतिनिधी)- मणिपूर भारतात आहे की नाही, असा प्रश्न मागील अनेक दिवसापासून देशवासीयांना पडला आहे. दोन स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना केली गेली. सामूहिक बलात्कार केला गेला. तरीही पंतप्रधान मोदी माैनात आहेत. याचा आपने निषेध केला आहे.
मानवतेला काळिमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी मे महिन्यातील ही घटना उशिरा व्हिडीओ मार्गे उघड झाली असली, तरीही आपल्या देशातील भाजपा सत्ताधारी आपल्या गुर्मीत आणि मुद्द्याला बगल देणारी भडकाऊ विधाने करण्यात मग्न आहेत.’ असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, परंतु केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार उलट आगीत तेल टाकण्याचे काम करीत असल्याने जनतेत तीव्र संताप आहे. भारतीयांना शरमेने मान खाली घालावी अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या , शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलेल्या मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करीत आम आदमी पार्टी तर्फे आक्रोश कँडल मार्च काढण्यात आला.
पुण्यातील १५ऑगस्ट चौक, कँटोन्मेंट ते डॉ आंबेडकर पुतळा असा महात्मा गांधी रोड मार्गे हा आक्रोश कँडल मार्च काढण्यात आला. त्यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने महिला व मणिपुरी लोक यात सामील झाले होते. यावेळी कार्यकर्त्यानी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.