पुणे – भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मध्यंतरी आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याची घटना घडली होती. याबाबत राज्यातील विरोधकांनी आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या सर्व घडामोडी थांबत नसताना आज किरीट सोमय्या हे पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी काँग्रेसकडून त्यांचा विरोध करण्यात आला.
पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात ‘सोमय्या गो बॅक’ चे फलक घेऊन आंदोलन केले आणि सोमय्यांविरोधात काळे झेंडे दाखविले.सोमय्या हे पुणे दौर्यावर आले असून ते पर्वती येथील भाजप पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांच्या घरी जेवण करण्यास येणार होते. पण त्यापूर्वी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे कार्यकर्त्यांसह पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात आंदोलन करण्यास थांबले होते.
किरीट सोमय्या यांच्या जाण्याच्या मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या दिशेने धावत कार्यकर्त्यांनी ‘सोमय्या गो बॅक’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.