Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी पत्नीने केली पतीची हत्या

मुलाच्या मदतीने काढला पतीचा काटा, हत्या करत रचला अपघाताचा बनाव, पण ती चूक महागात....

सांगली – राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून कोणत्याही कारणावरून कोण कधी काय करेल याची कल्पना करणे कठीण आहे. त्यातच आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेणा-या पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात ही घटना घडली आहे. बाबूराव दत्तात्रय पाटील असे हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत म्हणून चक्क आपला मुलगा आणि त्याच्या मित्रांशी संगनमत करून पत्नीने पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करणाऱ्याच्या तगाद्याला कंटाळून हे धक्कादायक कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबूराव दत्तात्रय पाटील यांनी घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज घेतले होते. तसंच काही माणसांकडून देखील हात उचल घेतलेली होती. हे कर्ज परत फेडण्यासाठी पैसे नसल्याने घेणेकरी तगादा लावत होते.कुटुंब या सर्व गोष्टींना वैतागलं होतं. त्यामुळे पत्नीने मुलासह मिळून पतीचा काटा काढल्याचा प्रकार घडला आहे. पतीच्या मृत्यूनंतर विम्याचे पैसेही मिळणार होते, त्यातून माय-लेकाने हा प्लान आखला. कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगावच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर रस्त्यावर दहा फेब्रुवारी रोजी शिरढोण येथील बाबुराव दत्तात्रय पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे भासवले होते. पण तपास करत असताना मोबाईल लोकेशन आणि ते देत असलेली माहिती विसंगत असल्याने पोलीसांना संशय आला. पोलिसांनी अगोदर मुलगा तेजसला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भिमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील यांचा आर्या हॉटेलजवळ रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी पत्नी वनिता बाबूराव पाटील, मुलगा तेजस बाबूराव पाटील आणि त्याचा मित्र भिमराव गणपतराव हुलवान या तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिवशरण हे करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!