
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या
प्रियकरानेही दिली साथ, हत्येनंतर आरोपीचे संजयसोबत संतापजनक कृत्य, पत्नी अशी सापडली
शिरोळ – अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. कहर म्हणजे हत्येनंतर प्रियकर व त्याच्या साथीदारांनी मृतदेह स्मशानभूमीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना शिरोळ तालुक्यात घडली आहे. संजय अल्लाबक्ष शिकलगार असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर दीपा संजय शिकलगार, प्रियकर दर्शन भगवान कांबळे, त्याचा भाऊ अमृत भगवान कांबळे व त्याचा काका स्वागत विजय कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय शिकलगार दीड वर्षांपासून गोव्यात गवंडी काम करीत होते. ते २६ फेब्रुवारीला गोव्यावरून गावी आले. गेल्या काही दिवसांपासून पत्नी दीपा व दर्शन यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. अनैतिक संबंधात पतीचा अडसर येत असल्याने पत्नी व प्रियकर यांनी त्यांचा काटा काढण्याचे ठरविले.त्यानुसार २७ फेब्रुवारीला रात्री संजय शिकलगार यांना घरातून पत्नी दीपा शिकलगार, तिचा प्रियकर दर्शन कांबळे व त्याचा भाऊ व चुलता यांनी त्याला धरणगुत्ती येथील माळभागावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातील लिंगायत स्मशानभूमीजवळ आणले. त्याठिकाणी कोयत्याने संजय यांच्या डोक्यात आणि मानेवर सपासप वार करून खून करण्यात आला. तसेच मृतदेह स्मशानभूमीत पुरण्यात आला. संजयचा भाऊ अनिल शिकलगार याने ४ मार्च रोजी शिरोळ पोलिस ठाण्यात दिली होती. याचवेळी संजयचा घातपात झाल्याचाही संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर शिरोळ पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत पत्नी दीपा, दर्शन कांबळेसह त्याचा भाऊ व चुलत्याला ताब्यात घेतल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे शिरोळ तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. मृत संजय यांच्या मागे तीन मुलगे, आई, भाऊ असा परिवार आहे.
संजयचा मृतदेह जेथे पुरण्यात आला होता, तेथे पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.