
बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या आक्रमक प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट आणखी रुंदावली असल्याची चर्चा आहे. प्रचारादरम्यान शरद पवार गट आणि अजितदादा गटाकडून परस्परांवर जोरदार टीका झाली.त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता दुरापास्त मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि तुम्हाला एकत्र येण्याची गरज पडली तर काय कराल, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला शरद पवार यांनी दिलेल्या उत्तराची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
शरद पवार यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. भविष्यात पुन्हा एकत्र यायचं झाल्यास किंवा राजकारणात गरज पडल्यास अजित पवार यांना मदतीचा हात द्याल का, असा प्रश्न यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, ती वेळ येणार नाही. कारण, अजितचा स्वभाव मला माहिती आहे. तो कधीच कोणासमोर हात पसरणार नाही.
शरद पवार यांनी ‘दैनिक लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्येही अजित पवार गटाकडून आजपर्यंत करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. अजित पवारांना काय कमी दिले? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबाबत मी कधीही मुलगी-पुतण्या असा भेद केला नाही. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात जबाबदारी देण्याचा प्रफुल पटेल यांचा प्रस्ताव मी फेटाळला, हा आरोप निरर्थक आहे.
सुप्रिया सुळे आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही. याउलट अजित पवार यांना कायमच सत्तापदे मिळाली. अजित पवार यांना राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीनवेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली असून त्या दिल्लीच्या राजकारणात आहेत. सुप्रिया यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही, हे शरद पवार यांनी स्पष्ट केले.