
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सरकार अजित पवार पाडणार?
अजित पवारांच्या आमदार खासदारांची विरोधकांबरोबर हातमिळवणी, अजित पवार मुख्यमंत्री होणार?
पुणे – महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. पण याच वेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही निशाना साधला आहे.
लक्ष्मण हाके यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच हा राजकीय अजेंडा असल्याची स्क्रिप्ट फोडली आहे. राजकीय अजेंडा कसा तर ते म्हणाले मी सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की, विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल. पण, आता मी जबाबदारीने सांगत आहे की, सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार, खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसेच अजितदादा पवार यांचे देखील आमदार, खासदार सामील आहेत, असा मोठा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. जरांगे नावाच्या चेहऱ्याआडून महाराष्ट्रामध्ये आमदार, खासदार सरकार अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण हा विषय नाहीच. मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की, जरांगेंची ही मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल. कारण शासनकर्त्या जमातीपासून, राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसी आरक्षण आहे. ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचे काय होईल? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. जरांगे यांना सर्वपक्षीय आमदार रसद पुरवत आहेत. पाच ते दहा टक्के झुंडीने लोक मुंबईला गेले असतील तर आम्ही ५० टक्के आहोत. अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत. अजित पवार यांचे आमदारच जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. याचा अर्थ काय? उद्या पुण्यात राज्य स्तरावरची बैठक घेणार आहोत. ओबीसी एक असते तर यांची हिंमत झाली असती का? छगन भुजबळ योग्य वेळी बोलतील अशी आमची आशा आहे.’, असे मत हाकेंनी व्यक्त केले आहे. जरांगेची मागणी मान्य झाली तर मराठा समाजाचं आरक्षण संपेल, असाही दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला ठाकरे आणि पवारांनी मदत केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. असली तरी ओबीसीमध्ये समावेशाच्या मागणीला विरोध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता वाढली आहे.