माजी मंत्री आणि आमदार एकनाथ शिंदेंची साथ सोडणार?
जाहीरातीतून धनुष्यबाण चिन्ह गायब, शिंदेंचा फोटोही लहान, भाजपात प्रवेश करणार?
मुंबई – आज दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. दोन गट झाले. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. आजघडीला एकनाथ शिंदे सत्तेत असले तरीही एकनाथ शिंदे यांना एक आमदार सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहिरात दिली आहे. त्यावरुन चर्चेला उधाण आले आहे. जाहिरातीमध्ये धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह गायब असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा लहान आहे. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान लावल्याने सावंत भाजपात जाणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद मिळवण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे तानाजी सावंत यांनी आधीही आपल्या सोशल मिडीया प्रोफाईलवरुन शिवसेनेचा लोगो काढून टाकत फक्त शिवसैनिक असा उल्लेख केलेला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे फक्त २० आमदार निवडून आले आहेत. पण मंत्रीपदावरुन सुरु असलेल्या रुसव्या फुगव्यामुळे पाच वर्ष आमदार संभाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.