Latest Marathi News
Ganesh J GIF

रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

चाकणकरांच्या विरोधात महाविकास आघाडीबरोबरच महायुतीच्या महिला नेत्या आक्रमक, चाकणकर अडचणीत

पुणे – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी महाविकास आघाडी आणि काही सामाजिक आणि राजकीय संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर दबाव वाढत आहे.

हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा आणि दीर सुशील यांना अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवीन आणि खळबळजनक खुलासे होत आहेत. वैष्णवीच्या आधी, हगवणे कुटुंब त्यांच्या मोठ्या सून मयुरीला हुंड्यासाठी त्रास देत असे. असे सांगितले जात आहे की, मयुरीने महाराष्ट्र महिला आयोगाकडे हुंड्यासाठी होणाऱ्या छळाबद्दल तक्रार केली होती. परंतु आयोगाने तक्रारीला महत्त्व दिले नाही. चाकणकर यांनी आधीच कडक कारवाई केली असती तर कदाचित वैष्णवीला आत्महत्येसारखे अनपेक्षित पाऊल उचलावे लागले नसते, असा आरोप केला जात आहे. राज्यातील अनेक महिला नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये महिला नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी महापाैर किशोरी पेडणेकर, यांनी देखील पुण्यातील घटनेनंतर रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, महिला आयोगावर कार्यक्षम आणि संवेदनशील महिला अध्यक्षा नेमण्याची मागणी केली आहे. नीलम गोऱ्हे यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाच्याच नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील याबाबत टायमिंग साधून राज्य महिला आयोगावर निशाणा साधला आहे. करुणा मुंडे यांनीही शेलक्या शब्दात रुपाली चाकणकर यांच्यावर निशाना साधला होता. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महिला आयोग कुठल्याही राजकीय पक्षाची शाखा नाही. आयोगात अराजकीय व्‍यक्‍ती नेमल्‍यास त्‍यांच्‍यावर दबाव येणार नाही. आगामी अधिवेशनात याबाबत मागणी करणार असल्‍याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

या प्रकरणात पोलिसांच्या आणि आयोगाच्या भूमिकेवर नागरिकांमध्ये नाराजी आहे. कारवाई उशिराने झाली, असा आरोप आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता चाकणकर काय भूमिका घेतात आणि राज्य सरकार यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!