
काँग्रेसला बाजूला सारत उद्भव ठाकरे शरद पवार एकत्र येणार?
काँग्रेसमुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याचा ठपका, यामुळे नाना पटोलेंवर नाराजी?
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. पण आता नवीन बातमी समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीतील मविच्या सुमार कामगिरीनंतर मविआच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. पण त्यातच काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली. या बैठकीत शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र येत काँग्रेसला बाजूला सारण्यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसनं स्वपक्षीयांचीही साधी बैठक घेतलेली नाही. काँग्रेसमध्ये आलेली मरगळ पाहता ठाकरे आणि पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगळी रणनिती आखल्याची चर्चा आहे. विशेष करुन काँग्रेसने विधानसभा निवडणूकीतही अनेकवेळा अडवणूकीची भूमिका घेतली होती. त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसला आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली होती. तसेच काँग्रेसकडून निर्णय घेताना बराचवेळ घेतला जातो. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता आहे.
स्थानिक निवडणुकांबाबत काँग्रेस नेत्यांची काय भूमिका आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होती. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आघाडीबाबत काँग्रेसशी चर्चा होणार की नाही, हे पहावे लागणार आहे.