
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होत नाही तेच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. 6 दिवस उपोषण केल्यानंतर जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकारने नरमाईची भूमिका घेतली.आता ज्या सगेसोयरे मागण्यासाठी जरांगेंनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्याबद्दल आता खुद्द जरांगेंनी सकारात्मक बातमी दिली आहे.आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी संभाजीनगरमध्ये आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि संभाजीनगरचे पालकमंत्री यांनी जरांगे यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी आरक्षण साठी राज्य सरकार काम करत आहे, असं आश्वासन जरांगे यांना दिलं. यावेळी जरांगेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
‘आरक्षणाच्या विषयावर आज मंत्र्यांसोबत चर्चा केली, काही दिवसांत सगेसोयरे विषय संपेल असे दिसतंय. आणखीन नोंदी शोधल्या पाहिजे असे आम्हाला अपेक्षित होते ते ही काम ते करत आहे. शंभूराजे सोबत व्हॅलिडिटीबाबत बोललो आहे. व्हॅलिडिटी अडवल्या जातायत म्हणून तक्रार केली शिंदे समितीने जोरात काम करावे, आणखी पुरावे शोधावे. कॅबिनेट बैठकीत मंगळवारी आमच्या मागण्याबाबत चर्चा करणार असे त्यांनी सांगितलं आहे, अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली.’सरकार कुठे ना कुठे विश्वास ठेवावा लागतो. देणारे ते आहेत. मी उगाचं कुणाचं कौतुक करत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम झपाट्याने करीत आहेत. मी आजही काही मागण्या केल्या त्या लगेच पूर्ण करण्यासाठी सरकार कामाला लागले आहे. उद्या व्यापक बैठक होणार आहे मला सगळी माहिती देत आहेत. माझा सरकारावर विश्वास आहे मात्र मी आधी समाजाचा आहे, माझ्या समाजाला जे हवे ते मिळाले नाही तर 288 जागा नाव घेऊन पाडणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगेंची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र मनोज जरांगे यांनी शासनाने आरक्षणासाठी काय करायला हवे अजून हे आम्हाला सांगितलं. आम्ही सगळे सकारात्मक आहोत, आचारसंहितेमुळे थोडा उशीर झाला. हैद्राबाद गॅजेटसाठी गरज पडल्यास आम्ही हैद्राबादला जाऊ. जरांगे यांनी आम्ही केलेल्या कामाचे कौतुक केलं आणि काही जबाबदारी सुद्धा आमच्यावर टाकली, त्यांनी मांडलेले मुद्दे आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आम्हाला मागणी मान्य करायची नसती तर शिंदे समिती नेमली नसती, आम्ही काम करतोय. भविष्यात त्यांना उपोषण आंदोलन करावे लागणार नाही याची काळजी घेऊ. सरकारची भूमिका स्पष्ट आहे जे काहीं करावे लागेल ते करू, असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं.