
प्रसिद्ध अभिनेत्रीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक होणार?
उद्योगपतीची केली तब्बल ६० कोटींची फसवणूक, आठ वर्षापासून सुरु होती फसवणूक, प्रकरण काय?
मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात ६० कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सन २०१५ ते २०२३ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे.
बेस्ट डील टीव्ही प्रा.लि.चे संचालक असलेल्या शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली दीपक कोठारी यांच्याकडून ६० कोटी ४८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कुंद्रा दाम्पत्याने कट रचून ही रक्कम व्यावसायिक कामासाठी न वापरता आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याची तक्रार दीपक कोठारी यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. ही कर्जाची रक्कम हडप करून आपली फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. कोठारी म्हणाले की, एका व्यक्तीने त्यांची शिल्पा आणि राज यांच्याशी भेट घडवून आणली होती. त्यावेळी शिल्पा आणि राज दोघेही बेस्ट डील टिव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक होते. होम शॉपिंग आणि ऑनलाइन रिटेल क्षेत्रात कार्यरत होती. या कंपनीत दोघांची ८७. ६ टक्के इतकी हिस्सेदारी होती. शिल्पा आणि राजने कोठारी यांच्याकडे ७५ कोटींच्या कर्जाची मागणी केली होती. या कर्जावर १२ टक्के दराने व्याज देऊ असे त्यांनी सांगितले होते. नंतर त्यांनी कर्जाचे पैसे गुंतवणुकीच्या रुपात घेण्याचा सल्ला दिला जेणकरून जास्त टॅक्स द्यावा लागणार नाही. यासोबतच प्रत्येक महिन्याला नफा आणि मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. कोठारी यांनी एप्रिल २०१५ मध्ये ३१.९ कोटी आणि सप्टेंबर २०१५ मध्ये २८.५३ कोटी रुपये कंपनीला ट्रान्सफर केले होते. ही रक्कम शेअर सब्स्क्रिप्शन आणि सप्लीमेंटरी अॅग्रीमेंटअंतर्गत देण्यात आली होती. यानंतर २०१७ मध्ये कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे कोठारी यांना समजले. एका कराराच्या अटींचे पालन कंपनीने केले नाही त्यामुळे कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे सांगण्यात आले. माझ्या पैशांचा गैरवापर करण्यात आला त्या दोघांनी वैयक्तिक खर्चासाठी पैशांचा वापर केला असा आरोप कोठारी यांनी केला.
पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यास आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा बारकाईने तपास केला जात आहे.