Latest Marathi News
Ganesh J GIF

कमळ फुलणार की तुतारी वाजणार ? नगर दक्षिणमध्ये हवा विखेंची की लंकेंची

नगर दक्षिण मतदारसंघात भाजपाने दुसऱ्यांदा खासदार सुजय विखे यांना उमेदवारी दिली होती तर दुसरीकडे महाविकास आघाडीने माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिल्याने मोठी चुरस निर्माण झाले आहे.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकास एक उमेदवार मैदानात असल्यामुळे मोठी रस्सीखेच झाली, त्यामुळे या मतदारसंघात कोण विजयीश्री खेचून आणणार याचा अंदाज बांधणंही कठीण झालं आहे, त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार की तुतारी वाजणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

2024 च्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कांदा प्रश्न, दूध दर, गुंडगिरी, एमआयडीसी, कुकडीचे पाणी आणि साखळी योजना या मुद्द्यांच्या अवतीभवती ही निवडणूक फिरत होती. मात्र नंतर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे कुटुंब यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. शरद पवार यांनी पहिल्यापासून प्रत्येक सभेत विखेंवरती आरोप केले त्या आरोपांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपाचे उमेदवार खासदार सुजय विखे यांनी रोखठोक उत्तरं दिली.

या मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील हे दुसऱ्यांदा भाजपाचे उमेदवार होते, त्यांनी मागील 5 वर्षांमध्ये या मतदारसंघात जवळपास 10 हजार कोटी रुपयांची काम केली, तसंच गावांनाही काही प्रमाणात निधी दिला आहे. तसंच स्थानिक प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आलं आहे. या मतदारसंघात त्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या मात्र लोक प्रतिनिधी म्हणून त्यांना सहज भेटणं शक्य नव्हतं, त्यांचा काही गावांपर्यंत थेट संपर्क नव्हता, अशी चर्चा आहे.

मात्र दुसरीकडे पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार निलेश लंके यांना सहज भेटता येत होतं. सर्वसामान्य माणसांमध्ये भेटताना कुणाच्याही खांद्यावरती सहज हात टाकून आपलेसे करणारे, कुणाचाही फोन उचलणारे आणि वेळप्रसंगी वडापाव आणि चहा कुठेही बसून खाणारे निलेश लंके यांचा हाच साधेपणा मतदारांना आवडला.या मतदारसंघात यावर्षी 66. 61 टक्के मतदान झाले आहे 2019 मध्ये 64. 86% मतदान झाले होते, त्यामुळे यावर्षी मतदानात 1.75 टक्क्याने वाढ झाली आहे. सर्वाधिक मतदान हे पारनेर मतदारसंघांमध्ये 70.13 टक्के आहे, तर राहुरी मतदार संघात 70 टक्के मतदान झाले आहे, त्यामुळे वाढत्या मतदानाचा फायदा कुणाला होणार? आणि तोटा कोणाला होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!