
उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळणार?
पक्ष एकनाथ शिंदेना पण चिन्ह ठाकरेंना मिळणार? आज 'सर्वोच्च' सुनावणी, राष्ट्रवादी फॅक्टरचीच चर्चा
दिल्ली – तीन वर्षापुर्वी एकनाथ शिंदे चाळीस पेक्षा जास्त आमदार घेवून बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यानी शिवसेनेवर दावा केला, आणि तो त्यांना मिळाला देखील. पण यावर आता सर्वोच्च न्यायालयात लढा सुरु असून उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे वादाचा नवा अंक आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं जावू नये यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना देताना निवडणुक आयोगाने न्यायालयप्रविष्ठ असे लिहिण्याचे निर्देश दिले होते. त्या धर्तीवर शिवसेना चिन्हाबाबत देखील निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. . येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘शिवसेना’ हे नाव, निवडणूक चिन्ह म्हणून ‘धनुष्यबाण’ आणि वाघासह पुन्हा भगवा ध्वज वापरण्याची परवानगी द्यावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हावर आज न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या खटल्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला चिन्ह आणि नाव वापरण्यास मनाई करा. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाप्रमाणे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत अंतरिम आदेश द्या, अशी विनंती शिवसेना ठाकरे गटातर्फे वकील देवदत्त कामत यांनी २ जुलैला केली होती. आजची सुनावणी केवळ याचिकेवरील प्राथमिक निर्णयासाठी असली तरी, या सुनावणीत न्यायालयाने तात्पुरता आदेश दिला, तर शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. याच वेळी, न्यायालय जर ‘निर्णय राखून ठेवतो’ असं म्हणालं, तर पुढील निवडणुकांसाठी शिंदे गटाला फायदा होऊ शकतो.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटासह शिवसेनेविरुद्ध बंड केले. पक्ष फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि त्यांचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे दोन्ही एकनाथ शिंदे गटाला दिले. या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.