ही लोकप्रिय अभिनेत्री या मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढणार?
पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेत या पक्षात केला प्रवेश, चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर राजकारणात दमदार एंट्री
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राजकारण आणि चित्रपटसृष्टी यांचे जवळचे नाते राहिले आहेत. अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर राजकारणात एंट्री करत आमदार खासदार बरोबरच मंत्रीपदे देखील मिळवली आहेत. अशी अनेक उदाहरणे आज समोर आहेत. पण आता आणखी एक अभिनेत्री राजकारणात दाखल होणार आहे.
भोजपुरी चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अक्षरा सिंह हिने राजकारणात प्रवेश कारणाचा निर्णय घेतला आहे. अक्षराने नुकतीच प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. यावेळी तिने प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पार्टीत प्रवेश केला. अक्षरा सिंह पटना येथील रहिवासी असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ती येथून निवडणूक लढवू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. तसंच, प्रशांत किशोर त्यांना कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी अक्षरा सिंह हिने प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. त्यानंतर ती राजकारणात येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी अक्षरा हिने आपण राजकारणात येणार नाही. तसेच, कोणत्याही पक्षात सामील होणार नाही असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसातच अक्षरा हिने जनसुराज अभियानाचे सदस्यत्व घेतले आहे. मी बिहारची लेक आहे आणि भविष्यात बिहार खऱ्या अर्थाने शिक्षित होईल आणि मोठी प्रगती करेल अशी आशा आहे. असे म्हणत अक्षराने राजकारणात येण्याबरोबरच लोकसभा निवडणुक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तसे संकेत देताना ती म्हणाली की, भविष्यात संधी मिळाल्यास ती निवडणूक लढवेल. मी कोणत्याही पक्षात जाऊ शकले असते, पण प्रशांत किशोर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, त्यांच्या जन सुराज कुटुंबात सहभागी होण्याचे मी ठरवले. बिहारच्या जनतेच्या चांगल्यासाठी जे काही करावं लागेल, ते करणार असल्याचंही ती म्हणाली आहे. अक्षरा सिंहसोबत तिचे वडील इंद्रजीत सिंहदेखील जन सुराजमध्ये सहभागी झाले आहेत.
अक्षराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अक्षराने २०१० मध्ये भोजपुरी चित्रपट ‘सत्यमेव जयते’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने ‘सत्या’, ‘तबादला’, ‘धडकन’ आणि ‘माँ तुझे सलाम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. भोजपुरी चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. आई आणि वडील दोघेही अभिनेते असल्यामुळे अक्षरा यांना कुटुंबातूनच अभिनय क्षेत्राचा वारसा मिळाला आहे.