
यवतमाळ दि ५ (प्रतिनिधी)- यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील नाल्यामध्ये पुलाच्या खाली एकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर परिसरात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे एक आॅगस्टला एका पुलाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरून पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवले असता हा मृतदेह उमरखेड येथील प्राध्यापक सचिन वसंतराव देशमुख यांचा असल्याचे समोर झाले. शवविच्छेदन अहवालात त्याचा खुन करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलीसांनी सचिन देशमुख, यांच्या हत्येप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काटा काढल्याचे समोर आले. मृत देशमुख याची पत्नी वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. तर तिचा प्रियकर फॉरेस्ट गार्ड म्हणून वन विभागात कार्यरत आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.