
पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून महिलेची आत्महत्या
पतीचे बाहेरख्यालीपण बेतले पत्नीच्या जीवावर, महिलेच्या नातेवाईकांचा वेगळाच दावा, मीरासोबत काय घडले?
अकोला – अकोला शहरातील शिवापुर म्हाडा कॉलनी परिसरात पती-पत्नीतील वादातून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे तणावात येऊन महिलेने आत्महत्या केली आहे.
मीरा मुरलीधर मानकर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीराचा तिच्या पती मुरलीधर मानकर यांच्यासोबत काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुरलीधर यांनी घर सोडले होते, याबाबतची तक्रारदेखील खदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मुरलीधरचे इतर महिलेसोबत संबंध होते. सततचा तणाव आणि या सर्व प्रकाराला कंटाळून मीरा यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तर मीराच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून मीराचा खून झाला असल्याचा आरोप केला आहे. मुरलीधरचे विवाहबाह्य संबंध होते आणि तो मीराला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. पतीच्या याच छळाला कंटाळून मीरा यांचा जीव गेला आहे. ही आत्महत्या नसून खून आहे, असा ठाम आरोप त्यांनी केला आहे. मीराने आत्महत्या केल्याचे कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला. तपासादरम्यान घटनास्थळी महिलेची चप्पल, मोबाईल फोन आणि इतर साहित्य आढळले. पोलिसांनी सध्या आकस्मित मृत्यूची नोंद केली असून आत्महत्ये मागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब तपासल्यानंतरच ही आत्महत्या आहे की, हत्या, याचा खुलासा होणार आहे. पण एका १४ वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवले आहे.