एक इंच जमिनीची विक्री न करता “यशवंत” सुरू करणार – माधव काळभोर
लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकात दुंडे
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी विरोधक खोटे आरोप करून सभासदांची फसवणूक करीत आहेत. कारखाना प्रशासकाच्या ताब्यात गेल्यावर बंद पडला परंतु,सभासद सुज्ञ आहेत. त्यांच्या बिनबुडाच्या आरोपाला बळी पडणार नाही. अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल हे शेतकरी व संचालकाच्या हितासाठी उभे करण्यात आल्याने कारखान्यावर एकहाती वर्चस्व असणार आहे.संपुर्ण पॅनेल विजयी होणार आहे. कारखान्याचा एक इंच तुकडाही न विकता कारखाना चालू करून दाखवितो, असे प्रतिपादन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव अण्णा काळभोर यांनी केले थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीला नारळ वाढवून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (ता. २९) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माधव काळभोर बोलत होते. या वेळी के. डी. कांचन, दिलीप काळभोर, सुरेश घुले, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, रवींद्र कंद, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, नवनाथ काकडे, राजाराम कांचन, महादेव कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, सनी उर्फ युगंधर काळभोर, लोचन शिवले, माजी सरपंच माधुरी काळभोर, ललिता काळभोर, अलका कुंजीर, नागेश काळभोर, अमित काळभोर, कमलेश काळभोर, बाजीराव भालसिंग, राजेंद्र खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना सुरेश घुले म्हणाले की, कारखान्यावर पूर्वी जे संचालक झालेले पदाधिकारी आहेत, ते आणि त्यांच्या कुटुंबातील कोणी नको, अशी चर्चा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झाली होती. तसेच कारखाना सुरु करण्यासाठी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे सर्वोतोपरी मदत करायला तयार आहेत. ज्यावेळेस कारखाना बिनविरोध करायचा होता, तेव्हा जुन्यापैकी कोणी नाही, अशी आपली भूमिका होती. मात्र, एक-दोन जुनी माणसे त्यामध्ये आली म्हणून त्याच्यातून काही फरक पडणार नाही. को अनुभवी असावी लागते. त्यामुळे कारखान्यावर आपलाच विजय नक्की असणार आहे
या वेळी बोलताना महादेव कांचन म्हणाले की, कारखान्यावर १५ वर्षे याठिकाणी संचालक म्हणून काम केले आहे. या वास्तूला माझे दैवत मानतो. या काळात एक रुपया सुद्धा घेतला नाही. महाराष्ट्रातला एक नंबरचा यशवंत सहकारी साखर कारखाना होता. आजही १५ किलोमीटरच्या परिसरातील शेतकरी आपल्याकडे येणारच आहे. विरोधकांनी खोटे आरोप करू नका. तुमची अंडी किती पिल्ले किती हे सर्व माहिती आहे. त्यामुळे जास्त उड्या मारू नका. कारण या निवडणुकीत १ हजार मतांच्या फरकाने शंभर टक्के आम्ही निवडून येणार आहोत. या वेळी बोलताना प्रकाश म्हस्के म्हणाले की, आपले जे उमेदवार आहेत ते सर्व चांगल्या प्रकारे सुशिक्षित आहेत. त्यांना सर्वांनी एकमताने निवडून द्या. कारखाना उत्तम पद्धतीने कसा चालवायचा याच्याबद्दल मला अधिक माहिती आहे. त्यामुळे आपण निश्चितच कारखाना चालू करू. दिलीप काळभोर म्हणाले की, यशवंत सहकारी साखर कारखाना तेरा वर्षांपूर्वी बंद पडला होता. हा कारखाना तेव्हा प्रशासकाच्या ताब्यात होता. तेव्हा कारखाना बंद पडला आहे. कारखान्यावर कर्ज असल्याने कारखाना बँकेच्या ताब्यात आहे. पहिले बँकेचे कर्ज भरल्यानंतरच कारखाना सुरु होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेऊन कारखाना चालू करणार आहे. त्यामुळे अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या सर्व सभासदांना निवडून द्या.
सुदर्शन चौधरी म्हणाले की, खरंतर सर्व उमेदवार हे एक नंबर आहेत; पण मला विशेष सांगायचे म्हणजे सहा नंबरमध्ये या वेळेस इतिहास घडणार आहे. विरोधकांचा पॅनेल हा शेतकरी विकास आघाडी नाही, तर व्यापारी विकास आघाडी आहे. त्यामुळे जनतेने रयत सहकार पॅनेलला मतदान करून मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे.