
‘होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून केला’
सुदर्शन घुलेने दिली गुन्ह्याची कबुली, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, यासाठी केला खून
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोपी असलेले सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारे यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सुदर्शन घुले याने हत्येचा घटनाक्रम सांगितला आहे. त्यामुळे कराड आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याची सुनावणी बुधवारी पार पडली. या सुनावणीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या टोळीतील तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वाल्मिक कराड आता आणखी संकटात सापडला आहे. सुदर्शन आपला गुन्हा काबुल करत नव्हता परंतु पोलिसांनी आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी घेतानाच व्हिडिओ दाखवल्यांनतर त्याने आपले तोंड उघडले. ‘होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला’, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. हत्येमागचे कारण सांगताना त्याने आमच्या मित्राच्या वाढदिवसादिवशी संतोष देशमुखने आम्हाला आवादा कंपनीच्या आवारात मारहाण केल्याचे सांगितले. त्याचा राग मनात ठेऊन तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख यांचा अडथळा येत असल्याने नियोजन आखून त्यांना मारले असल्याचे सांगितले. आरोपी महेश केदारे याने हत्येच्यावेळी आपण व्हिडिओ शूट करत असल्याचे कबूल केले. तसेच जयराम चाटे यानेदेखील आपल्यावरील सर्व आरोप मान्य केले. या तिघांच्या कबुलीमुळे बीड चा आका म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड आता अधिक अडचणीत आला आहे. सुदर्शन घुलेने दिलेल्या जबाबात वल्मिक कराडचे नाव घेतल्याने त्याची अडचण अधिक वाढली आहे. दरम्यान पुढील सुनावणी आता १० एप्रिलला होणार आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी फरार असून, इतर आरोपी कारागृहात आहेत.