Latest Marathi News
Ganesh J GIF

दोन प्रेयसीच्या वादातून तरुणाचे मारहाण करत अपहरण

अपहरण करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, प्रेमाच्या त्रिकोणातून अपहरणाचे नाट्य, दिया आणि ज्योतीच्या वादात.....

बीड – बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तींचा हैदोस पाहायला मिळाला आहे. शहराबाहेरील चराटा फाटा भागात एका तरुणाला दहा ते पंधरा लोकांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून फरफटत गाडीत टाकून त्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. पण या प्रकरणी आता चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे.

नागनाथ नन्नवरे याला मारहाण करत टोळक्याने त्याचे अपहरण केले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर नागनाथच्या पत्नी दिया नन्नवरे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी रातोरात तपास करत धाराशिव जिल्ह्यातून आठ पुरुषांसह एका महिलेला अटक करत या तरुणाची सुटका केली. पण पोलिसांनी दिलेली माहिती चकित करणारी आहे. नागनाथची पूर्वीची गर्लफ्रेंडने, ज्योती काळे हिने पुण्यातील गुंडांना सुपारी देऊन हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. नागनाथची आताची पत्नी दिया नन्नवरे हिचे २०११ साली पहिले लग्न संतोष पवार याच्यासोबत झाले होते. मात्र त्याला दारूचे व्यसन होते. काही काळाने दिया आणि नागनाथ नन्नवरे यांचे प्रेम संबंध जुळले आणि अकरा वर्षापूर्वी ते दोघे पळून बीडमध्ये आले. तेव्हापासून दोघे सोबत वास्तव्यास आहेत. मात्र नागनाथ याचे यापूर्वी ज्योती काळे हिच्याशी प्रेम संबंध होते. पण दिया नागनाथच्या आयुष्यात आल्याने नागनाथ याने ज्योतीसोबतचे संबंध तोडले. त्यामुळे ज्योती संतापली होती. दुसरीकडे दियाने दिलेल्या माहितीनुसार, दियाचा पुर्वीचा दिर राम पवार हा दियाच्या आईकडे जामखेडमध्ये गेला व आता आमच्यासोबत दियाचा काही संबंध नाही, परंतु तुम्हाला आमच्या सोबत संबंध कायमचे मिटवायचे असतील तर पैसे देवून मिटवून घ्या, पैसे नाही दिले तर दिया व नागनाथ या दोघांना उचलून नेऊ अशी धमकी दिली होती, असा दावा केला होता. पण पोलिस तपासात आता वेगळेच कारण समोर आले आहे.

ज्योतीनेच नागनाथचे अपहरण घडवून आणल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली आहे. पण या प्रकरणामुळे पोलिसांची मात्र पुरती दमछाक झाली होती. पण अखेर या प्रकरणावर पडदा टाकण्यात पोलीसांना यश आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!