तरूणांनो! तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध
अर्जभरतीला होणार लवकरच सुरुवात, तब्बल एवढ्या जागेसाठी होणार भरती, बघा बातमी?
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- राज्यातील बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार आहे. यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे तरूणांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे.
महसूल विभागाच्या वतीने राज्यातील रिक्त असलेल्या चार हजार ४६४ तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे. विशेष म्हणजे एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे. तलाठी संवर्गातील क गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिली आहे. तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकूण चार हजार ४६४ तलाठ्यांची पद रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे. राज्याच्या जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने येत्या २० जूनपासून भरतीसाठी लिंक खुली करण्याची परवानगी शासनाला मागितली आहे. लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे. त्यानुसार, तलाठ्यांमधील नोकरभरतीत आदिवासी समाजाच्या नागरिकांना संधी मिळावी यासाठी ‘पेसा’ नियमानुसार जागा आरक्षित करण्यात येणार आहेत.
जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायत म्हणाले, ‘या परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी मागितली आहे. येत्या २० जूनच्या जवळपास ही लिंक खुली होईल, अशी अपेक्षा आहे. सुमारे पाच लाख उमेदवार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार, तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.