
‘या’ खासदारावर स्काॅलर तरूणीचे गंभीर आरोप
खासदाराने शोषण केल्याचा आरोप, तीन वर्ष रिलेशनशीपचा दावा, कोण आहे डाॅ. रोहिणी?
इंदूर – खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर एका तरूणीने गंभीर आरोप केले आहेत. पीएचडी स्काॅलर डाॅ. रोहिनी घावरी यांनी असे त्या तरूणीचे नाव आहे. आझाद यांनी अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप रोहिनी यांनी केला आहे.
सोशल मिडियावर पोस्ट करत रोहिनी यांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. ती चंद्रशेखरची पीडिता क्रमांक ३ असल्याचं सांगितलं. तसेच चंद्रशेखर आणि त्यांच्या कुटुंबाने शोषण केले असल्याचा आरोप तिने केला आहे. पहिल्या पोस्टमध्ये तिने लिहिले, “चंद्रशेखर हा दलित समाजासाठी एक कलंकित नेता आहे. एकीकडून फसवून दुसरीकडे, आणि तिसरीकडे जाणं ही त्याची सवय आहे. फसवणूक आणि विश्वासघात हे त्याच्या रक्तातच आहे.” अशा शब्दांत रोहिणीने आझाद यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर तिने दुसरी पोस्ट शेअर करत बरेच गंभीर आरोप केले आहेत. “चंद्रशेखरने मला वापरून टाकलं. बहिणी-मुलींच्या सन्मानाला त्याच्यासाठी काहीही किंमत नाही. बहुजन चळवळीच्या नावावर दलित समाजातील महिलांच्या विश्वासाशी खेळ केला जात आहे.” तसेच, “गेल्या दहा वर्षांत त्याने समाजासाठी एकही चांगलं काम केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. भाजपच्या कृपेने तो खासदार झाला, पण खरा समाजनेता तो कधीच बनू शकणार नाही”, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. रोहिणी आणि आझाद या दोघांमध्ये २०१९ पासून जवळपास तीन वर्षांपर्यंत संबंध होते. शिक्षणासाठी स्वित्झर्लंडमध्ये असताना दोघांची ओळख झाली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये मतभेद झाले होते, आणि त्यानंतर नातं संपुष्टात आले होते. पण आता या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रोहिणीने आता उघडपणे आवाज उठवत इतर पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.
डॉ. रोहिनी यांनी जन पॉवर फाउंडेशन स्थापन करून आपले सामाजिक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांनी सांगितले की, “मला न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही, हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे.” चंद्रशेखर आझाद यांनी यापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.