
रंग लावण्यास विरोधी केल्याने तरुणाची गळा दाबून हत्या
हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद, तरूणाला ग्रंथालयात घुसून मारहाण, आरोपी अद्याप फरार
दाैसा- होळीच्या पार्श्वभमूमीवर रंग लावण्यापासून तीन जणांना रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एका तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात असलेल्या रामावास गावात ही घटना घडली आहे. गावात शासकीय ग्रंथालय आहे. धुळवडीच्या दिवशीही काही विद्यार्थी ग्रंथालयात अभ्यास करत होते. तर काही विद्यार्थी बाहेर रंग खेळत होते. गावातील रहिवासी अशोक, बबलू आणि कालूराम हे मृत हंसराजला रंग लावण्यासाठी स्थानिक ग्रंथालयात पोहोचले होते. पण हंसराजने त्यांना रंग लावण्यापासून रोखले. त्यामुळे संतापलेल्या तिघांनी हंसराज मीणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. हंसराज ग्रंथालयात घुसला. त्यानंतर तिघे आणि इतरही तरुण आले. त्यांनी हंसराजला मारहाण केली. हंसराजचा गळा दाबून ठेवला. इतरांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. हंसराज खाली कोसळला. त्याला तातडीने लालसोट येथील रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना ग्रंथालयातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हंसराज स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने ग्रंथालयात अभ्यास करत होता. सहायक पोलीस अधीक्षक दिनेश अग्रवाल यांनी घटनेबद्दल माहिती दिली. हंसराज माणी याची ग्रंथालयात गळा दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
मीणाच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी हंसराजचा मृतदेह घेऊन राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत, कुटुंबाला ५० लाख रुपये भरपाई, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर अखेर मृतदेह महामार्गावरून हटवण्यात आला.