
मुंबई प्रतिनिधी – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना सोबत घेत नवा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे आमदारांचा मोठा गट गेल्यामुळे दोन तृतीयांश नियमाप्रमाणे सर्वांत मोठा गट कुणाचा तसेच एकनाथ शिंदे थेट शिवसेनेवर हक्क सांगू शकतात का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाजूला करून एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष ताब्यात घेऊ शकतात का?, अशीही चर्चा सुरू झाली आहे. याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण बिराजदार यांचे ‘ट्वीट थ्रेड’ व्हायरल झाले आहे. या थ्रेडमध्ये त्यांनी शिवसेनेची घटना कागदपत्रांसह स्पष्ट केली आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुखांचे अधिकार, निवडीचे अधिकार, प्रतिनिधी सभा यासह कार्यकारिणी निवडीच्या अधिकारांबाबत माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरेंना बाजूला सारून शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का?, यावर भाष्य करताना त्यांनी सद्य:स्थितीत ते अशक्यप्राय वाटते. कारण, प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार निश्चित केलेले असतात, असे सांगितले आहे. पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना अधिकृत असते. आता शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख’ हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेनाप्रमुखांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मदतीने आता शिंदे त्या पदावर बसू शकतात का?, तर त्याचे उत्तर शिवसेनेच्या घटनेनुसार ‘नाही’ असेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे