
मुंबई, प्रतिनिधी – एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेची दोन गटामध्ये विभागणी झाली आहे. पक्षाचे बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. तर या गटावर कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांना लक्ष्य करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी या आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावरील संघर्ष सुरू असतानाच ठाकरे सरकारमधील मंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी बंडखोर आमदारांना उघड धमकी दिली आहे. उद्धव ठाकरेंसोबत सध्या शिवसेनेचे फक्त 3 मंत्री असून त्यामध्ये देसाईंचा समावेश आहे.
गोरेगावमधील शिवसेना उत्तर भारतीय कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात देसाई बोलत होते. ‘शिवसेना भवनात एक दरोडा पडला आहे.ते (बंडखोर) महाराष्ट्रातल्या कोणत्याही बिळात असते तर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना फरफटत आणलं असतं. त्यामुळे ते घाबरून गुवाहाटीमध्ये बसले असून तिथून धमकी देत आहेत. सत्ताबदलाची स्वप्नं पाहात आहेत. ज्या दिवशी ते मुंबईत येतील त्या दिवशी निम्मे शिवसेना भवनात जातील आणि उर्वरित विमानळाच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत. त्यांना विमानतळावरच घेराव घातला जाईल. शिवसेनेतील बंडखोर यापूर्वी पराभूत झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचीही तशीच अवस्था होईल, असा दावा देसाईंनी केला आहे.