Latest Marathi News

पालघर जिल्ह्यात 125 अनधिकृत शाळा ! मग पुणे जिल्ह्यात किती ?

अनधिकृत शाळा सुरू झाल्यास ....,?

गेल्या काही वर्षांत राज्यभरात अनधिकृत शाळांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्यातील कोणत्याही भागात नवीन अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना व्यक्तिश: जबाबदार धरले जाणार आहे, तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यात जिल्हा परीषद, नगरपालिका, शासकीय आदिवासी आश्रमशाळा, खाजगी अनुदानित आश्रमशाळा, खाजगी अनुदानित, समाज कल्याण विभाग खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित, खाजगी विनाअनुदानीत, समाज कल्याण विभाग खाजगी विनाअनुदानीत व स्वयं अर्थसहाय्यता विभागांच्या एकूण 2568 मान्यताप्राप्त शाळा सुरु आहेत. मात्र या मान्यताप्राप्त शाळांव्यतिरिक्त विना परवानगी अनधिकृत शाळांचादेखील सुळसुळाट झाला आहे. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक विभाग मिळून 125 शाळा अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या शाळांची संख्या अधिक आहे. जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांविरोधात कारवाई सुरू झाल्यानंतर 35 अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्या असून 19 शाळांच्या व्यवस्थापनावर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरीत शाळांविरोधात कारवाई करण्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

राज्य शासनाची मान्यता नसतानाही अनधिकृतरित्या शाळा सुरू करून विद्यार्थी, पालक आणि शासनाची फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रत्येक जिल्ह्यांतील शाळांच्या मान्यता पत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांत अनधिकृत शाळा सुरू असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व निवियमन) अधिनियम 2012 तसेच नियम 2020 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेच्या दर्जात वाढ करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अनेक संस्थांनी शासनाची मान्यता न घेता अनधिकृतपणे शाळा सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. या अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता भविष्यात यापुढे अधिकृत शाळा सुरू होऊ नये याकरिता सूचना देण्यात आल्या आहेत.

“पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांवर जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागामार्फत वेळोवेळी कारवाई सुरू आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत शाळांची संख्या अधिक आहे. महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार संबंधित महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे आहेत. प्राथमिक विभागातील ३५ अनधिकृत शाळा बंद झाल्या असून सुरू असलेल्या ४३ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईकरीता शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. तक्रारप्राप्त शाळांची तपासणी सुरू असून यापुढे कारवाईची मोहीम अधिक तीव्र करणार आहोत.”

– शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परीषद, पालघर

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!