Just another WordPress site

14 दिवसात महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं ? महाराष्ट्र खबर स्पेशल रिपोर्ट

मुंबई विशेष प्रतिनिधी –  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार जूनच्या सुरुवातीपर्यंत मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येत होतं. राज्यसभा निवडणूक, विधानपरिषद निवडणूक त्यापाठोपाठ एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थक आमदारांसह केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकारणाची दिशा बदलून गेलीय. जून महिन्याच्या सुरुवातीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे १५३ आमदारांचं संख्या बळ होतं. एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी केलेल्या बंडामुळं उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्याकडे आता ४० आमदार आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या बाजूनं १५ आमदार उरले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एक महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस असा संघर्ष होता. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष राज्याच्या राजकारणात पाहायला मिळेल.

उद्धव ठाकरेंसोबत १५ आमदार

उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टानं बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी त्यासोबत विधानपरिषदेचं सदस्यत्व देखील सोडलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि शिवसेनेकडून दावे प्रतिदावे करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या सोबत कालपर्यंत ३९ आमदार होते. आज हिंगोलीतील कळमनुरीचे संतोष बांगर देखील शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानं उद्धव ठाकरेंसोबत विधानसभेचे १५ आमदार राहिले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत बाळापूरचे नितीन देशमुख,परभणीचे डॉ.राहुल पाटील,उस्मानाबादचे कैलास पाटील, कुडाळचे वैभव नाईक,राजापूरचे राजन साळवी,गुहागरचे भास्कर जाधव, वरळीतील आदित्य ठाकरे, शिवडीचे अजय चौधरी, चेंबूरचे प्रकाश फातेर्पेकर, भाडूंप पूर्वचे रमेश कोरगांवकर, विक्रोळीचे सुनील राऊत, जोगेश्वरीचे रवींद्र वायकर, सुनील प्रभू हे आमदार राहिले आहेत

GIF Advt

शिवसेना कुणाची?

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेत सरकार स्थापन केलं आहे. पक्षांतर बंदीकायद्यातील २००३ च्या दुरुस्तीनुसार पक्षातून फुटलेल्या आमदारांचा स्वतंत्र गट राहू शकत नाही त्यांना दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन व्हावं लागेल. मात्र, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी आम्ही शिवसेना सोडली नसल्याचं म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सरकारची बहुमत चाचणी जिंकली आहे. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंपुढे शिवसेना वाचवण्याचं आव्हान निर्माण झालंय. एकनाथ शिंदे गटाची पुढील काळातील पावलं ही आम्हीच शिवसेना आहे अशी असू शकते. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुढील काळात शिवसेना कुणाची याबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतो.

तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!