विषारी वायूच्या गळतीत ९ जणांचा मृत्यू, अनेकजण बेशुद्ध
प्रशासनाकडून परिसर सील, पाळीव प्राण्यांचाही मृत्यू, एनडीआरएफ घटनास्थळी कार्यरत
लुधियाना दि ३०(प्रतिनिधी)- पंजाब राज्यातील लुधियाना शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. विषारी वायूची गळती होऊन नऊ लोकांचा मृत्यू झाला तर ११ जण बेशुद्ध झाले आहेत. ही घटना शहरातील ग्यासपूर परिसरात घडली आहे. गॅस गळती झालेला परिसर तातडीने सील करण्यात आला आहे.
गॅस गळतीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाची वाहनेही घटनास्थळी आली. नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील एका फॅक्टरीमधून गॅस लीक झाला अचानक गॅस गळती झाल्याने परिसरात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या इमारतीत दुधाचं केंद्र होतं. सकाळी दूध घेण्यासाठी गेलेले नागरिक बेशुद्ध झाले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. गॅस गळती झालेल्या इमारतीच्या ३०० मीटरच्या आत लोक बेशुद्ध झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गॅस गळतीत अनेक पाळीव प्राण्यांचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिस प्रशासन आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल आहेत. गोयल मिल्क प्लांट नावाच्या या कारखान्यात मोठ्या कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थ येतात. या कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे.
कारखान्यातील पाईप फुटल्याने गळती झाली असावी, अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र अद्याप गॅस गळतीचे अधिकृत कारण समोर आले नाही. प्रशासनाकडून संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे. परिसरापासून लोकांनाही अंतर राखण्याचे आवाहन केले जात आहे.