मुंबई महानगरपालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवीवर भाजपाचा डोळा
शिंदे-फडणवीस सरकारला पराभव दिसत असल्यानेच निवडणूका नाही, जोरदार हल्लाबोल
मुंबई दि २ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत होत असताना विरोधकांनी पुन्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मविआला मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाला भिती बसली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिंदे गट व भाजपाचा धुव्वा उडाला व शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला.
मागील तीन वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा दारूण पराभव होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रे कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी विशाल सभा झाली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते ते पुढे म्हणाले की, शेतकरी, मध्यमवर्ग महिला, तरुण हे सर्वजण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहेत. राज्यात अनेक महानगरपालिकांची मुदत संपून दोन दोन वर्ष झाली पण प्रशासक बसवले आहेत. महानगरपालिका जनतेसाठी आहेत पण तिथे निवडणूक घेत नाही. सर्व कारभार प्रशासनाच्या हाती सोपवला आहे. सरकार पराभवाला घाबरत आहे म्हणून निवडणूका घेत नाही. खारघर मध्ये सरकारने हत्याकांड घडवले पण अजून एकही गुन्हा नोंद केलेला नाही आणि कसलीही कारवाई झालेली नाही. तर बारसूमध्ये जनतेवर अत्याचार करत आहेत. बारसूचा रिफायनरी प्रकल्प हा कोकणच्या विकासासाठी नाही तर सरकारच्या बगलबच्च्यांच्या विकासासाठी आहे हे उघड झालेले आहे. आज जर सरकारने निवडणुका लावल्या तर त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपा शिंदे सरकारवर सडकून टीका केली. मविआ एकत्र राहून निवडणुका लढल्या तर सत्ताधारी पक्षाचा पराभव होतो हे मागील काही निवडणुकांवरून दिसले आहे. विधान परिषद, अंधेरी, कसबा पोटनिवडणुकीत व बाजार समिती निवडणूका जिंकून मविआने हॅटट्रिक केला आहे . आता मुंबईसह इतर महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा लोकसभा निवडणुका जिंकून आपल्याला षटकार मारायचा आहे. जनता आसाराम गयारामांना स्थान देत नाही.भाजपाला मंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे ती मुंबईकरांच्या विकासासाठी नाही तर त्यांचा डोळा हा मुंबई महापालिकेतील ९२ हजार कोटींच्या ठेवींवर आहे. असेही चव्हाण म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनिल केदार, नसीम खान, जितेंद्र आव्हाड, माजी केंद्रीय मंत्री नसीम खान यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मुंबईकर नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.