महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख ठरली?
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, अपात्रेचा निकाल शिंदेच्या विरोधात जाणार? वाचा
मुंबई दि ५(प्रतिनिधी) – राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडीहोत आहेत. यातच आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? हा निर्णय प्रलंबित आहे. यावर पुढील आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. निकालाची तारीख देखील ठरली आहे.
शिवसेनेत शिंदे यांचे मोठे बंड झाले आणि हा पक्ष विभागला गेला. आता चिन्ह आणि पक्ष कुणाचा याचा संघर्ष न्यायालयात सुरू आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका ठाकरे गटाकडून, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव शिंदे गटाकडून यासह आणखी चार याचिकांवर निर्णय येणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीला जोरदार वेग आला आहे. सत्तासंघर्षाचा निकाल ८ ते १२ मेच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. त्यातून सरकारचं भवितव्य ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेवर सर्वेच्च म्यायालया काय निर्णय देणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल बैस यांची भेट घेतली आहे. राज्यातील घडामोडी पाहता ही भेट महत्वाची मानली जात आहेत. या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण या भेटीचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान विधानसभा सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा संविधानाने आणि नियमांनी विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे हा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात. त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांच्यासह त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करावे, अशी याचिका ठाकरे गटाने केली आहे. त्यावर पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली आहे. पण नार्वेकर यांनी हा दावा केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू यांच्या भेटीनंतर केल्याने या दाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.