काँग्रेसचा कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाचा नेता ठरला
कर्नाटकात भाजपाचे पानिपत, तब्बल १३ मंत्र्याचा दारूण पराभव, बजरंगबली फॅक्टरी काँग्रेसला सुकर
बेंगलोर दि १३(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. या निवडणूकीत भाजपाचा जोरदार पराभव झाला असून त्यांचे जवळपास १३ मंत्र्यांचा पराभव झाला आहे.
कर्नाटक निवडणूकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. पण या निवडणूकीत भाजपाच्या १३ मंत्र्याचा पराभव करत मतदारांनी आपली नाराजी दाखवून दिली आहे. पराभूत १३ मंत्र्यांमध्ये गोविंदा करजोला, श्रीरामुलु, व्ही. सोमण्णा, जे. सी. मधुस्वामी, बी. सी. पाटील, डॉ. के. सुधाकर, एम. टी. बी. नागराज, नारायणगौडा, बी. सी. नागेश, हलप्पा अचार, शंकर मुनेकोप्पा, यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसने आता सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. डीके शिवकुमार हे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कर्नाटकमध्ये काँग्रेसचे मोठे नेते आहेत. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री होण्याची आपली महत्त्वाकांक्षा उघडपणे जाहीर केली होती. एक्झिट पोलमध्ये देखील डीके शिवकुमार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. १९८० पासून डीके काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. १९८९ मध्ये डीकेंनी सथनूर विधानसभेतून थेट माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांचा पराभव केला होता. १९९९ मध्ये पुन्हा त्यांनी आताचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा सथनूरमधून दारुण पराभव केला होता. तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सिद्धरामय्या यांच्याकडे पाहिले जाते. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये देखील सिद्धरामय्या भावी मुख्यमंत्री म्हणून आघाडीवर होते. सिद्धरामय्या यांचा म्हैसूर भागातील लिंगायत मतदारांवर मोठा प्रभाव आहे. जनता दलात असणाऱ्या सिद्धरामय्या यांनी २००५ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष असून ते गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. तर सिद्धरामय्या राज्यातील मोठे नेते आहेत. त्यामुळे काँग्रेस इतर राज्याप्रमाणे जुने नेतृत्व म्हणून सिद्धरामय्या यांना संधी देतात की अगोदरच्या घटनांपासून धडा घेत डीके शिवकुमार यांना संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.