
यामुळे नाना पटोले यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद जाणार?
नवीन प्रदेशाध्यक्षही निश्चित?, आगामी निवडणूकीसाठी पक्षात मोठे फेरबदल होणार?
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- कर्नाटक विजयाने उत्साह वाढलेल्या काँग्रेस पक्षात सगळीकडे चैतन्याचे वातावरण असताना महाराष्ट्रात मात्र गटबाजीला ऊत आला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असुन नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. विजय वडेट्टीवार, सुनील केदार, संजय निरुपम आणि शिवाजीराव मोघे या नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांच्याकडे पटोले यांची तक्रार केली होती. पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत तांबे यांना उमेदवारी देण्यावरुन जो वाद झाला तेंव्हापासून पटोले यांच्यसविरोधात नाराजी वाढत चालली आहे. नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष असून तो आता उघडपणे बाहेर आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत होणार फटका टाळण्यासाठी पक्ष नवीन नेतृत्वाला संधी देण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या गोंधळात नाना पटोले यांची मात्र विकेट पडण्याची शक्यता आहे.
नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांमध्ये सुनिल केदार आणि सतेज पाटील यांची नावे सगळ्यात पुढे आहे. त्यामुळे आता नवीन प्रदेशाध्यक्ष विदर्भाचाच असणार की पश्चिम महाराष्ट्रातील असणार की आणखी कोणी असणार हे पहावे लागणार आहे.