
सुट्टीवर आलेल्या जवानावर गावगुंडाचा जीवघेणा हल्ला
वडिलोपार्जित जमिनीच्या वादावरुन मारहाण, हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, जवान जखमी
अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- अहमदनगर तालुक्यातील जेऊर वाघवाडीत जमिनीच्या वादातून एका जवानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेत जवानासह त्यांच्या कुटुंबातील ८ जण जखमी झाले आहेत.
महेश वाघ असे जखमी जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर तालुक्यातील जेऊर वाघवाडीत वाघ राजस्थान बिकानेर ६६ मधील तोफखाना युनिटवर कार्यरत आहेत. काही कामानिमित्त ते सुट्टीवर गावाकडे आले होते. यावेळी नातेवाईक आणि त्यांच्या शेतजमिनीवरून वाद झाला. महेश वाघ यांनी सांगितले की त्यांची वडिलोपार्जित ७९ गुंठे जागा ही महेश वाघ यांच्या वडिलांच्या नावाने आहे. पण त्यांच्या नातेवाईक त्याला त्रास देत असल्यामुळे महेशच्या वडिलांनी या जमिनीतून ४५ पॉईंट १५ फूट जागा त्याच्या नावाने करून दिली. मात्र जमीन देऊन सुद्धा त्या इसमाने ३ गुंठ्यावर अतिक्रमण केले. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता वाघ आणि कुटुंबीयावर ७ ते ८ जणांनी जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात जवान महेश वाघ यांच्यासह कुटुंबातील आठ जण जखमी झाले आहेत. महेश वाघ यांनी पोलिसांना फोन केला होता. ‘आमच्या जमिनीवर काही काही लोक बळजबरीने घर बांधत असून ते माझ्यावर हल्ला करण्यासाठी येणार आहेत. तुम्ही पोलीस पाठवा अशी विनंती केली होती. पण तोवर हल्ला झाला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून ३ जणांना अटक केली आहे. पोलिस तपास करत आहेत. दरम्यान गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा मोठे आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.