Latest Marathi News
Ganesh J GIF

रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या

बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले

पुणे दि २७(प्रतिनिधी)- कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते…. वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्त भोरच्या दिशेने निघालेल्या सुळे यांनी स्वतःच्या गाडीसह कार्यकर्ते आणि अन्य वाहनांसह मागून आलेल्या एसटी बसमधून सर्व प्रवाशांना खेड शिवापूर टोल नाका आणि अन्य सावली असलेल्या ठिकाणी पोहोचवले.

आज दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान सातारा रस्त्यावर शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. पुण्याहून सांगलीकडे निघालेली शिवशाही बस शिंदेवाडी जवळ बंद पडली होती. त्या बस मधील सर्व प्रवाशी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा उन्हाच्या काहिलीने हैराण होत बसजवळ उभे होते. भोर तालुका दौऱ्यावर निघालेला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा त्याठिकाणी पोहोचला, त्यावेळी रस्त्यावर उभ्या प्रवाशांना पाहून सुळे यांनी गाड्या थांबवण्याची सूचना केली आणि स्वतः गाडीतून उतरून प्रवाशांची विचारपूस केली.

गाडी बंद पडल्याने ते सर्वजण थांबल्याचे कळताच सुळे यांनी तातडीने हालचाल करत काही प्रवाशांना स्वतःच्या गाडीत घेतले, काहींना कार्यकर्त्यांच्या गाडीत बसवून घेण्याच्या सूचना दिल्या. मागून काही एसटी गाड्या सातारा रस्त्यावर धावत होत्या, त्यांना थांबण्याची विनंती केली. त्यांपैकी सांगली जिल्ह्यातील पेठ येथे निघालेल्या एसटीचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांनी सुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गाडी थांबवली आणि काही प्रवाशांना आपल्या बसमध्ये बसवून घेतले. अशा रीतीने सर्व प्रवाशांना खेड शिवापूर टोल नाका परिसरात सावली असलेल्या ठिकाणी हलवले.

उन्हाने हैराण झालेल्या त्या प्रवाशांसाठी सुळे यांनी पाण्याची व्यवस्था करायला लावली. मागे आणखी काही प्रवाशी राहिले असतील तर त्यांना पण घेऊन येण्याबाबत आपल्या सोबतच्या पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्यांना सूचना दिल्या. सर्व प्रवाशांची संपूर्ण सुविधा झाली असून सर्वजण सुखरूप सावलीत पोहोचले आहेत, याची खात्री करूनच त्या पुढे रवाना झाल्या. त्यानंतर काही वेळाने बंद पडलेली शिवशाही बस दुरुस्त होऊन पुढे आल्यानंतर तीत बसून सर्व प्रवाशी पुढील प्रवासासाठी रवाना झाले. या प्रसंगानंतर भर उन्हात मायेची पाखर घेऊन धावून आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गाडीतील सर्व प्रवाशांनी भरभरून आभार मानले.

एसटी महामंडळाने गाड्या तपासूनच सोडाव्यात – खा. सुळे
दूरच्या प्रवासाला सोडण्यात येणारी प्रत्येक एसटी बस एसटी महामंडळाने तपासूनच पाठवायला हवी, अशी अपेक्षा यावेळी सुळे यांनी व्यक्त केली. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!