मुंबई दि १० (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकीय गदारोळ सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असला तरीही सुनावणीची नवीन तारीख दिली जात आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी १० दिवस लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पुढची सुनावणी आता २२ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्ष आणखी काही रेंगाळणार आहे.
बंडखोर आमदारातील १६ आमदारांना अपात्र ठरवायचे की नाही हे प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवायचे की नाही यावर ४ तारखेला सुनावणी झाली होती.यावेळी न्यायालयाने त्यांना आपला युक्तीवाद लेखी स्वरूपात देण्यास सांगितला होता. त्याचबरोबर शिवसेना पक्षाच्या दाव्याचे प्रकरण आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही शिवसेनेवर दावा करत आहेत. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्यास ४ आठवड्यांचा अवधी दिला आहे. आता २२ तारखेला सुनावणी होणार पण आत्ताचे न्यायाधीश एन. व्ही. रमणा २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी घटनापीठासमोरच राहणार असल्याचं मत कायदे तज्ज्ञांनी मांडल आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांसोबत बंडखोरी केली होती. त्यानंतर सुरु झालेला सत्ता संघर्ष दोन महिने झाले तरीही सुरूच आहे.
गेल्या दोन सुनावणीत दोन्ही बाजूने ज्येष्ठ विधीज्ञांनी घमासान युक्तीवाद केला आहे. याप्रकरणी ८ ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून १२ ऑगस्ट करण्यात आली. आता पुन्हा ही तारीख बदलण्यात आली आहे. आता ही सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे संगण्यात येत आहे. हा बदल का झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.