महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी राष्ट्रवादी पहाडासारखी उभी
जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर जोरदार टिका, सामान्य माणसांबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा ठपका
इस्लामपूर दि ७(प्रतिनिधी)- भाजपाचे केंद्र सरकार जनतेच्या प्रश्नावर, सामान्य माणसांच्या आंदोलनाबाबत असंवेदनशील आहे. त्यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा आटोकाट प्रयत्न केला,मात्र अखेर त्यांना शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे लागले. त्याप्रमाणे महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनातही त्यांना माघार घ्यावी लागणार असल्याचे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील आंदोलनात केले आहे.
कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष, भाजपा खा.ब्रिजभूषण सिंहला तात्काळ अटक करून त्याच्यावर पोक्सो कायदांतर्गत कडक कारवाई करा. कुस्ती आणि क्रांतिकारी लढ्याची मोठी परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी पहाडासारखे उभा राहतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ब्रिजभूषण सिंह व भाजपाच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात,आणि महिला कुस्तीपटूंच्या समरणार्थ तीव्र आंदोलन केले. जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कचेरी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. आप्पा कदम म्हणाले,ब्रिजभूषण गेल्या १५ वर्षापासून फेडरेशनचा अध्यक्ष आहे. त्याने कुस्ती वाढविण्याचे नव्हे,कुस्ती संपविण्याचे काम केले. देशातील कुस्तीपटूं सह सर्व खेळाडू,प्रशिक्षक व पालकांनी महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी उभा राहूया. पै.आनंदराव धुमाळ म्हणाले,या महिला कुस्तीपटूंच्या कुटुंबियांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या महिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जागतिक पदक आणून आपल्या देशाची मान उंचावली आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आंदोलनात प्रतिक पाटील, वैभव शिंदे,महाराष्ट्र केसरी आप्पा कदम,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी,आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आनंदराव धुमाळ,पै.विकास पाटील, पै.विकास पाटील,पै.अशोक मोरे,भारतश्री किरण शिंदे,कामगार केसरी प्रा.नितीन शिंदे, पै.कुंडलिक गायकवाड,पै.संग्राम जाधव यांच्यासह कुस्तीपटूं,खेळाडू उपस्थित होते.