पुणे: जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. तरुणाच्या मोटारीची तोडफोड करुन दोन लाखांची रोकडही लुटण्यात आली.
या प्रकरणी पंकज सदाशिव गायकवाड, देवीदास बाळासाहेब गायकवाड, तेजस मल्हारी गायकवाड, गजानन गुलाब गायकवाड, विजय सदाशिव गायकवाड, सोमनाथ उर्फ बाजीराव रामा गायकवाड (सर्व रा. ऊरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे यांच्यासह इतर आठ ते दहा जणांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सागर अशोक कुटे (वय ३४, रा. कोंढवा ) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सागर आणि त्यांचे सासरे संभाजी गायकवाड मोटारीतून नगर रस्ता परिसरातील कोलवडी गावात गेले होते. त्या वेळी जमिनीच्या वादातून टोळक्याने हातात शस्त्रे, बांबू उगारुन परिसरात दहशत माजविली. टोळक्याने सागर आणि सासऱ्यांना शिवीगाळ केली, तसेच सागरवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. सागर यांच्या मोटारीच्या काचा फोडून दोन लाखांची रोकड चोरुन नेली. पुन्हा या परिसरात आला तर जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.