पत्नी आणि दोन मुलांची हत्या करत डाॅक्टर पतीची आत्महत्या
चार जणांच्या हत्याकांडाने पुणे जिल्हा हादरला, सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा, चिमुकल्यांच्या हत्येचे दु:ख
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टरने आत्महत्या करत पुर्ण कुटूंब संपवल्याची घटना घडली आहे. डाॅक्टर पतीने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आहे.
डॉ. अतुल शिवाजी दिवेकर, पल्लवी अतुल दिवेकर, अद्वित अतुल दिवेकर, वेदांती अतुल दिवेकर अशी मृतांची नावे आहेत. दौंड तालुक्यातील वरवंड येथे हे कुटुंबं वास्तव्यास होते. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केले आहे. अतुल दिवेकर आणि कुटुंबीय दौंड शहरातील वरवंड परिसतील चैत्राली पार्क सोसायटीत राहायला होते. डाॅ. दिवेकर पशूवैद्यकीय तज्ज्ञ आहेत. त्यांची पत्नी पल्लवी एका शाळेत शिक्षिका आहे. मंगळवारी बराच वेळ झाला तरी दिवेकर यांच्या घराचा दरवाजा बंदच होता त्यामुळे शेजा-यांना शंका आली. दुपारी दिवेकर यांच्या बाजूच्या व्यक्तींनी घरात पाहणी केली असता त्यांना डॉ. अतुल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी पल्लवी खाली निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. यवत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी आतमध्ये प्रवेश करून पाहणी केली असता एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात ‘मी आत्महत्या करत असून पत्नी आणि दोन लहान मुलांचा खून केला आहे. मुलांचे मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत टाकून दिले आहेत’, असे डाॅ. अतुल यांनी चिठ्ठील लिहिले होते. पोलीसांनी विहिरीकडे धाव घेत, मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले, पण विहीर खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यास अडचण येत होती. अतुल दिवेकर पशुवैद्यकीय डॉक्टर होते. तसेच कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडल्याचं बोलले जात आहे.
या प्रकरणामुळे दौंड तालुक्यातील वरवंड गावात सगळीकडे खळबळ उडाली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सागर चव्हाण, दत्तात्रय टकले, हनुमंत भगत करीत आहेत. अंगावर शहारे आणणार्या या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हाच हादरून गेला आहे.