पुणे : कमी कलावधीत झटपट पैसे कमावण्याचा प्रयत्न अनेक जणांकडून होत असतो. पैसे कमवण्याचा हा प्रयत्न करताना फसव्या जाहिराती अन् सोशल मीडियातील पोस्टला अनेक जण बळी पडतात.
मग त्यात सामान्य व्यक्ती असतो अन् उच्चशिक्षित व्यक्तीही असतो. पुणे येथील संगणक अभियंत्यास असे झटपट पैसे कमवणे चांगलेच महागात पडले. या आमिषाला बळी पडल्यामुळे त्याची आयुष्यभराची कमाई गेली. सर्व काही हातून घेतल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुणे येथील हिंजवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार
ही घटना २८ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान पुणे येथे घडली. परंतु तक्रार दोन महिन्यांनंतर नोंदवण्यात आली आहे. स्नेहासिंग हृदयनारायण सिंग (वय ३५ , रा. हिंजवडी, पुणे ) यांची फसवणूक झाली आहे. सिंग हे आयटी अभियंता आहेत. त्यांना पार्ट टाईम नोकरीची ऑफर सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. त्यात YouTube व्हिडिओला लाईक करण्याचे काम होते. सुरुवातीला त्यांना नेमून दिलेल्या कामाचे १५० आणि ३५० रुपये दिले गेले. या प्रकरणातील आरोपींनी नंतर सिंग यांना टेलिग्रामची लिंक पाठवली. त्याना टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये जॉईन केले. त्यानंतर त्याला ऑनलाईन कामे करण्यास सांगण्यात आले. मग पुढे जाऊन गुंतवणुकीचे फंडे सांगत त्यातून फसवणुकीस सुरुवात केली.
अन् झाली फसवणुकीस सुरुवात
आधुरी गांगुली नावाच्या महिलेने सिंग यांचा विश्वास संपादन केला. मग पुढे त्यांना गुंतवणूक करुन चांगली रक्कम मिळण्याचे आश्वासन दिले. गुंतवलेल्या रक्कमेचे ३० टक्के मिळणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सिंग यांनीही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. हळूहळू करत त्यांनी एकूण ४९ लाख रुपये गुंतवले. परंतु त्यांना कधीच रक्कम परत मिळाली आहे. आपली फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले अन् अखेर पोलिसांत त्यांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीचे कलमही लावण्यात आले आहे.