लग्नानंतर तीन महिन्यातच नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या
नस कापून घेत सासूचाही आत्महत्येचा प्रयत्न, पोलीसांसमोर तपासाचे आव्हान, नेमके काय घडले
सातारा दि २६(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर सुनेने आत्महत्या केल्याचे पाहून सासूने देखील आपल्या हाताची नस कापत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नीलम अनिकेत माने असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर राणी अंकुश माने असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सासूचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड येथील नीलमचा तीन महिन्यांपूर्वी विंग येथील अनिकेत मानेशी विवाह झाला होता. शनिवारी रात्री नीलम स्वयंपाकगृहात झोपली होती. तर पती अनिकेत, सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघे जण बाहेरच्या खोलीत झोपले होते. सकाळ झाली तरीही निलम दरवाजा उघडत नसल्यामुळे कुटुंबियांनी दरवाजा तोडून स्वयंपाकगृहात प्रवेश केला. यावेळी नीलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. हे पाहयचा सासू राणी माने यांनी आपल्या हाताची नस कापत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यानंतर कराड पोलीसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. पुढील तपास कराड पोलीस करत आहेत.
निलमच्या माहेरच्या लोकांनी नीलमच्या मृतदेहावर तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी नेमका हा प्रसंग का घडला याचा तपास कराड पोलिसांना करावा लागणार आहे.